
बीड, 23 मार्च (हिं.स.)। लिंबागणेश गावातील पायल निर्मळ व रोहित निर्मळ या बहीण-भावाचे आई-वडील शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रमोद निर्मळ यांना दीड एकर शेती असून गायी व कोंबडीपालनाचा ते व्यवसाय करतात. कुटुंबातील पायल निर्मळ ही गावातच पोलिस भरतीची तयारी करत होती. काही दिवसांपूर्वीच तिने पोलिस पदाची परीक्षा दिली होती. दरम्यान एका महिन्यात एकाच कुटुंबातील बहीण-भावाला शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. बहीण पायल प्रमोद निर्मळ हिची बीड पोलिस दलात; तर तिचा भाऊ रोहित निर्मळ हा एमएसएफ (महाराष्ट्र सुरक्षा दल) मध्ये भरती झाला आहे. बहीण-भावाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
निर्मळ कुटुंबातील पायल व रोहित या दोघा बहीण-भावाला एकाच महिन्यात शासकीय नोकरीची संधी मिळाल्याने त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असताना या दोन भावंडांनी यश मिळवले असून गावाचा नावलौकिक वाढवला आहे. कोणत्याही खासगी क्लासेसला न जाता पायलने स्वअध्ययन करत हे यश मिळवले आहे. तिचा भाऊ रोहित निर्मळ हा रत्नागिरी येथे भरती झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis