
नाशिक, 23 मार्च (हिं.स.)।
- महानगरपालिका मखमलाबाद गावातील हद्दीत बाह्य परीक्रमा मार्ग बाधित शेतकऱ्यांना आजच्या बाजार भावाच्या तुलनेत आणि होणारी नुकसान भरपाई चा योग्य व वाढीव मोबदला मिळावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मखमलाबाद ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. आमदार अँड राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक वाळू काकड नगरसेवक प्रमोद पालवे यांच्यासह शेतकऱ्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. नाशिक महानगरपालिके हद्दीतील बाह्य रिंगरोड संदर्भात प्रशासनाकडून आमच्या मखमलाबाद गावातुन शासनाच्या प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पाचा मार्ग नियोजित असून या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरु झाल्याचे निदर्शनास येत आहे.हा प्रकल्प विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी, नाशिक महानगरपालिका हद्दीतील मखमलाबाद गावातील सर्व शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध नोंदविला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या जमिनी या त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत, ज्या पिढ्यानपिढ्या जोपासल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुणे रिंग रोड प्रमाणे नाशिक रिंगरोड करिता प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्याबाबत आपण प्रयत्न करावे. सध्या स्थितीत सदरच्या बाधित जागेचा बाजार भाव व रेडी रेकनर यात प्रचंड तफावत आहे. त्यात आपण विशेष लक्ष देऊन न्याय द्यावा.काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये सक्तीने भूसंपादन होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने आम्हा सर्व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या दृष्टीने, आमच्या मखमलाबाद गावातील बाह्यरिंग रोडला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना, व्यावहारिक अडचणी यांचा सविस्तर विचार करून त्यांच्यासोबत सुसंवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आमच्या बाधित शेतकऱ्यांबरोबर चर्चा करूनच त्यांच्या समस्या सविस्तर समजून घ्याव्यात आणि बाजार भावाच्या तुलनेत योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करावे असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी नगरसेवक वाळू काकड नगरसेवक प्रमोद पालवे,शेतकरी गणेश पिंगळे रावसाहेब शिंदे बाळासाहेब धात्रक, बाळू पिंगळे, शिवाजी पिंगळे, बबन तांदळे, रावसाहेब शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV