
लातूर, 23 मार्च (हिं.स.)।
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेल्या औसा पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलिस हवालदाराला न्यायालयाने दोषी ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाने ३ वर्षे साधा कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणातील आरोपी बाबासाहेब धोंडीराम सोठ (वय ५०), तत्कालीन पोलिस हवालदार, पोलीस ठाणे औसा (सध्या सेवानिवृत्त) यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल होता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथील न्यायाधीश आर. आर. भोसले यांनी २३ मार्च २०२६ रोजी निकाल देत आरोपीस दोषी ठरवले.
प्रकरणाची पार्श्वभूमी
आरोपीने लोकसेवक म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करत तक्रारदाराविरुद्ध दाखल प्रकरणात सौम्य कारवाई करण्यासाठी व जेलमध्ये न टाकण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर पंचासमक्ष ४ हजार रुपये स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
शिक्षा
कलम ७ अंतर्गत : २ वर्षे ६ महिने साधा कारावास
कलम १३(२) अंतर्गत : ३ वर्षे साधा कारावास
दंड : १५,००० रुपये
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक ए. बी. साळुंके यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजात सहाय्यक शासकीय अभियोक्ता शिवनारायण रादड यांनी बाजू मांडली, तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी काम पाहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis