
नाशिक, 23 मार्च (हिं.स.)।
: पुणे विद्यापीठाच्या कारभारावर अधिसभेच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला. विद्यापीठाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचा आरोपही यावेळी सदस्यांनी केला.
कुलगुरू विद्यापीठासाठी पुरेसा वेळ देत नाही, इच्छाशक्ती नाही. कार्यक्रम आणि अतिरिक्त प्रभार यामुळे दोघेही विद्यापीठात नसतात. गेली २-३ वर्षे सतत मागण्या करून पूर्णवेळ कुलसचिव, अधिष्ठाते देण्यास टाळाटाळ सुरू आहे. विद्यापीठाबाहेरच्या काही घटकांना वापरून विद्यापीठप्रमुखच निवेदने, तक्रार अर्ज मागवून सर्व निर्णयांना खो घालतात. नियमबाह्य कामकाज सुरू आहे. प्रशासकीय प्रमुखांच्या पाठबळामुळे काही घटकांच्या माध्यमातून विद्यापीठाला बदनाम आणि ठेकेदारांना ब्लॅकमेल करण्याचे उद्योग सुरू आहेत.
अकॅडमिक क्रेडिट बँकसारख्या निर्णयांची अंमलबजावणी दिरंगाई केली जाते. कांबळे नावाच्या कर्मचाऱ्याचे नियमबाह्य निलंबन केले. पहिल्या सत्र परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर
करण्यात आलेले नाहीत. सुमारे पाच लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत विद्यापीठाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप सागर वैद्य यांनी केला.
विद्यार्थी सत्र परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत
विद्यापीठाचे कामकाज रामभरोसे सुरू आहे. लाखो विद्यार्थी सत्र परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. पीएच.डी कमिटी, शैक्षणिक अप्रूव्हल महिनोन्महिने मिळत नाही. कार्यक्रम आणि अतिरिक्त प्रभार यामुळे विद्यापीठ प्रमुख यांना विद्यापीठासाठीच वेळ उरलेला नाही. ते विद्यापीठात फार वेळ नसतात. मॅनेजमेंट काउन्सिल, पर्चेसलाही अनुपस्थित असतात. कुठल्याही बोगस तक्रार अर्जाचा बाऊ करून महत्त्वाचे निर्णय घेणे टाळले जातात. अधिकार मंडळांनी घेतलेल्या अनेक निर्णयांची वर्षानुवर्षे अंमलबजावणी नाही. रुसाचा ६२ कोटींचा निधी अखर्चित झाला तर पुढील वर्षी मंजूर असलेले ११६ कोटींचा निधी रद्द केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठाला स्लो पॉयझनिंग सुरू आहे. नियमबाह्य कामकाज सुरू आहे. या कार्यपद्धतीला कंटाळून मी आणि बागेश्री मंथळकर यांनी सभात्याग केला.
सागर वैद्य, मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV