
लातूर, 23 मार्च (हिं.स.)।
लातूर ते रेणापूर या राष्ट्रीय महामार्गावर नेहरूनगर परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्यावर जागोजागी भेगा पडल्या, तडे गेले यामुळे अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून वाहन चालकांना कसरत करत प्रवास करावा लागत असे. रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताच सदरील रस्त्यावर महामार्ग विभागाच्या वतीने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनधारकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
लातूर औरंगाबाद या रस्त्याचे केंद्रीय रस्ते महामार्ग विभागामार्फत मागील काळात सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यामुळे प्रवासाची मोठी सोय झाली. मात्र गेल्या काही दिवसापासून सदरील महामार्ग रस्त्यावरील लातूर ते रेणापूर दरम्यानच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर नेहरूनगर परिसरात जागोजागी अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या रस्त्याला तडे गेल्याने विविध वाहनधारकासह दुचाकी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अपरात्री तर तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असे. महामार्गावरील सदर भेगा पडलेल्या ठिकाणी वाहन धारकाचे अपघात झाले आहेत.
महामार्गावर नेहरूनगर परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्यावर पडलेल्या भेगा आणि तडे यामुळे नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सदरील रस्त्याची परिस्थिती निदर्शनास आणून दिली व तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. आ. कराड यांच्या सूचनाची तात्काळ दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग लातूर विभागाच्या वतीने सोमवारी नेहरूनगर परिसरातील महामार्ग रस्त्यावर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. सदरील डागडुजीचे व दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनधारकासह नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis