
मुंबई , 23 मार्च (हिं.स.)।लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘द ५०’ च्या पहिल्या सिझनला अखेर विजेता मिळाला आहे. अनेक महिन्यांच्या कडव्या स्पर्धेनंतर या शोची ट्रॉफी बिग बॉस फेम शिव ठाकरे यांनी आपल्या नावावर केली आहे.‘द ५०’च्या ग्रँड फिनालेमध्ये शिव ठाकरे यांनी गायक काका, इन्फ्लुएंसर फैसल शेख उर्फ फैजू, कृष्णा श्रॉफ आणि रजत दलाल यांसारख्या मजबूत स्पर्धकांना मागे टाकत शोचे पहिले विजेतेपद पटकावले. शिव यांच्या विजयासोबत त्यांच्या एका लकी चाहत्यालाही मोठा फायदा झाला आहे.
फिनालेमध्ये रजत दलाल बाद झाल्यानंतर शिव ठाकरे, काका, कृष्णा आणि फैजू या चार स्पर्धकांमध्ये जोरदार सामना रंगला. चार टप्प्यांच्या आव्हानांनंतर शिव ठाकरे यांनी कृष्णा आणि फैजू यांना मागे टाकत ट्रॉफी जिंकली. विजयानंतर शिव ठाकरे यांना ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली; मात्र शोच्या फॉरमॅटनुसार ही रक्कम त्यांना नव्हे, तर त्यांच्या नोंदणीकृत फॉलोअर्समधून निवडलेल्या त्यांच्या नंबर वन चाहत्याला देण्यात येते.या शोचा लकी फॅन सीताराम प्रह्लाद अघाव ठरला असून बक्षीस रक्कम त्यांना मिळणार आहे. शिव ठाकरे याआधी बिग बॉस सीझन १६मध्ये सहभागी झाले होते, मात्र तेव्हा ते विजेते होऊ शकले नव्हते आणि फर्स्ट रनर-अप ठरले होते. आता ‘द ५०’चे विजेते बनत त्यांनी ही कमतरता भरून काढली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शिव ठाकरे यांनी आपल्या आनंदाची भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, मनापासून खेळत आणि स्वतःशी प्रामाणिक राहूनही विजय मिळवता येतो हे त्यांना दाखवायचे होते. तसेच ‘द ५०’चे पहिले विजेते म्हणून त्यांची कायम आठवण ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode