
रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : देवरूखमधील श्री देव रघुवीर देवस्थान आणि अभिरुची-देवरूख या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन रामनवमीच्या निमित्ताने चैत्र पालवी हा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये सौ. भाग्यश्री देशपांडे-पाटील यांनी बहारदार गायन केले.
सौ. भाग्यश्रीताईंनी रामनामाचा गजर सादर करून उपस्थित रसिकांनाही ताल धरायला लावला. त्यानंतर आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आम्हा नकळे ज्ञान हे अभंग, कानडा राजा पंढरीचा हे भक्तिगीत,
झाले युवती मना दारुण रणरुचिर प्रेमसे आणि हे सुरांनो चंद्र व्हा, ही नाट्यपदे, पायोजी मैंने राम रतनधन पायो हे हिंदी मीराभजन सादर झाले. शेवटी राधे कान्हा किती दिसतो गोजिरवाणा ही गवळण आणि
अवघा रंग एक झाला व लई नाही लई नाही मागणे या भैरवीतील रचनांनी बहारदार कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमामध्ये सौ. भाग्यश्रीताईंनी आपल्या गायनकौशल्याचा परिचय देत आलाप, ताना आणि सरगम यांचा यथायोग्य वापर करीत प्रत्येक गाण्याची खुमारी अधिकच वाढवली. रसिकांनीही काही वेळा सहगायन करून त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. उत्तम तयारी, दमदार सुरुवात, कार्यक्रम स्थान आणि निमित्त यांना साजेशी गीतनिवड, सहकलाकारांची उत्तम साथ, साथीदारांना स्वतंत्र वादन करण्यासाठी दिलेली उचित संधी तसेच कलाकार आणि श्रोते यांच्यातील उत्तम संवाद यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला.
कार्यक्रमाला अमित ओक यांनी संवादिनीवर सुरेल आणि समर्पक संगत केली. निखिल रानडे यांनी दमदार तबला वादन, संकेत नवरत यांनी पखवाजावर नादनिर्मिती करीत आणि नील भावे यांनी उत्तम तालवाद्य साथ करून कार्यक्रमात अधिकच रंग भरला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रघुवीर देवस्थानचे विश्वस्त आणि देवरूखमधील जुने जाणते संगीतसेवक चंद्रकांत पवार, कुंदन कुलकर्णी आणि शैलेश साने यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सर्व कलाकारांचे स्वागत करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी