
सोलापूर, 23 मार्च (हिं.स.) : युद्धामुळे थांबलेली निर्यात, देशांतर्गत बाजारातील घटलेली मागणी, शिपमेंटचे पाच पटीने वाढलेले शुल्क आणि कच्च्या मालाची प्रचंड महागाई यामुळे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला अंदाजे ५०० ते ७०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
सध्याची परिस्थिती पंधरवड्याहून अधिक काळ टिकल्यामुळे उद्योगांवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. यामुळे कामगारांच्या रोजगारावरही भीती निर्माण झाली आहे. शहरातील वस्त्रोद्योगात सोलापुरी चादरी, टेरी टॉवेल, युनिफॉर्म, गारमेंट्स, होजिअरी, एथनिक व फॅन्सी वेअर्स यांसारखी विविध उत्पादने बनतात.विशेषतः पॉलिस्टर आणि पॅकिंग मटेरियलचे भाव ३५ टक्क्यांनी वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. निर्यातीच्या बाबतीतही संकट आहे; युद्धापर्यंत निर्यातदार एजंट नवीन ऑर्डर स्थानिक उत्पादकांकडून घेणे थांबवतात. यामुळे करोडो रुपयांचे उत्पादन सध्या ठप्प झाले आहे.
सोलापूरचे निर्यातदार मुख्यतः कतार, ओमान, युएई, ईराण, इराक, सौदी अरेबिया, बहरीन यांसारख्या आखाती देशांमध्ये निर्यात करतात, परंतु युद्धामुळे या सर्व निर्यात पूर्णपणे थांबली आहे.विशेषज्ञांचा अंदाज आहे की जर युद्ध लवकर संपले नाही, तर उद्योगावर होणारा नकारात्मक परिणाम आणखी गंभीर होऊ शकतो आणि रोजगाराची परिस्थिती आणखी बिकट होईल.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड