
लातूर, 23 मार्च (हिं.स.)। बदलत्या काळानुसार सक्षम व सर्वार्थाने समृद्ध समाज निर्माण करणे ही काळाची गरज बनली असून, यासाठी प्रत्येकाने विविध प्रकारचे साहित्य वाचनाची आवड जोपासावी, असे प्रतिपादन ‘रीड लातूर’ उपक्रमाचे संस्थापक धिरज विलासराव देशमुख यांनी केले. बाभळगाव येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
वाचन संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘रीड लातूर’ या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रकट वाचन, निबंध लेखन व काव्य वाचन स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना लातूर, औसा व रेणापूर तालुक्यातील सुमारे ९० जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याला वाव मिळत असून, वाचनाची आवड वृद्धिंगत होण्यासही मोठी मदत होत आहे. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर प्रमाणपत्र व मेडल प्रदान करून गौरविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बाभळगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळा तसेच दयानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सन्मान ‘रीड लातूर’ उपक्रमाचे संस्थापक धिरज विलासराव देशमुख व सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चि. वंश देशमुख व कु. दिवीयाना देशमुख यांचीही उपस्थिती होती.
गेल्या चार वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या ‘रीड लातूर’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे. वाचनामुळे विचारांना दिशा मिळते, ज्ञान समृद्ध होते आणि जीवनाला योग्य आकार प्राप्त होतो. विविध प्रकारच्या पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयुक्त ठरते. त्यामुळे सक्षम व सुजाण समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने वाचनाची सवय जोपासणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. लातूर जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांचे कार्य इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवनातील कोणत्याही आव्हानांपुढे न खचता धैर्याने सामोरे जावे, असा संदेश त्यांनी दिला.
या प्रसंगी सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची “I Will Fly” ही प्रेरणादायी कविता विद्यार्थ्यांना वाचून दाखवली. या कवितेतून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द, आत्मविश्वास आणि उंच भरारी घेण्याची प्रेरणा जागवली जाते. ‘मी उंच भरारी घेईन, माझ्या स्वप्नांना गवसणी घालीन’ हा संदेश देत ही कविता विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवण्यास प्रेरित करते. कठीण परिस्थितीतही हार न मानता सतत प्रयत्न करत राहण्याची शिकवण या कवितेतून दिली जाते. दीपशिखाताईंनी ही कविता सादर करत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार आणि मोठे ध्येय ठेवण्याची प्रेरणा निर्माण केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ‘रीड लातूर’ उपक्रमाचे समन्वयक राजू सी. पाटील यांनी मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis