
लातूर, 23 मार्च (हिं.स.) : राज्यातील वृत्तपत्र उद्योगासमोरील वाढती आर्थिक चणचण आणि शासनाच्या उदासीन धोरणांच्या निषेधार्थ ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या वतीने अहमदपूर येथे तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या सहा वर्षांत छपाई साहित्याच्या दरात सुमारे १५० टक्क्यांची वाढ झाली असूनही शासकीय जाहिरात दरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
२०१९ पासून कागद, शाई, वीज आणि मनुष्यबळ यांसारख्या मूलभूत खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र शासनाकडून मिळणारे जाहिरात दर स्थिर असल्याने वृत्तपत्र चालवणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर जिल्हास्तरावर लाक्षणिक आंदोलने सुरू आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही अद्याप ठोस निर्णय न झाल्याने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
प्रमुख मागण्या
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
महागाई निर्देशांकानुसार जाहिरात दरात तातडीने १५०% वाढ करावी.
ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करून पारदर्शकता आणावी.
शासकीय जाहिरातींचा किमान आकार २०० चौ.से. निश्चित करावा.
लघु व मध्यम वृत्तपत्रांना मोठ्या वृत्तपत्रांप्रमाणे समान संधी द्यावी.
थेट जाहिराती देण्याची पद्धत बंद करून सर्व जाहिराती माहिती खात्यामार्फत द्याव्यात.
२५ वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांची प्रलंबित नैसर्गिक दरवाढ तातडीने लागू करावी.
स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पुढाकार
या निवेदनावर तालुका अध्यक्ष रत्नाकर नळेगावकर, सचिव अनिल चवळे, कोषाध्यक्ष सय्यद सलीम, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, नरसिंग सांगवीकर, खजिनदार मेघराज गायकवाड तसेच प्रसिद्धी प्रमुख गोविंद काळे आणि शिवाजी गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
इशारा
“जर आर्थिक अडचणींमुळे वृत्तपत्र उद्योग कमकुवत झाला, तर त्याचा थेट परिणाम जनतेच्या माहितीच्या अधिकारावर होईल,” असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माहिती व जनसंपर्क मंत्र्यांनाही तहसीलदारांमार्फत पाठवण्यात आल्या आहेत.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis