
पुणे, 23 मार्च (हिं.स.)।
मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कॅनालमधून वेगाने वाहणारे पाणी रस्त्यावर येत असून मगरपट्टा सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. तसेच हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरले आहे .जवळच असलेल्या जहांगीर नगर येथील वस्तीमध्ये ही पाणी शिरत असून नागरिक भयभीत झाले आहेत.
मगरपट्टा रोड परिसरात सुरू असलेल्या पाइपलाइन कामामुळे कॅनालला मोठा धोका निर्माण होऊन अखेर कॅनाल फुटल्याची घटना घडली आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून कॅनालमधून किरकोळ पाणी गळती सुरू होती. अखेर मोठे भगदाड पडून कॅनाल फुटला. त्यामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने मगरपट्टाच्या मागील बाजूचे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. एका बाजूचा रस्सा बंद झाला असून एकच मार्ग सुरू असल्याने साधारण दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु