
इस्लामाबाद, 23 मार्च (हिं.स.) : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, यावेळी पीएसएल सोडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे. त्यांनी म्हटले आहे की, पीएसएलमध्ये न खेळता आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या क्रिकेटपटूंवर बोर्ड कारवाई करेल. त्यांनी गेल्या वर्षी कॉर्बिन बॉशवर लादलेल्या एका वर्षाच्या बंदीचे उदाहरण दिले. २०२५ मध्ये, कॉर्बिन बॉशने पेशावर झल्मी सोडून मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला. आता, २०२६ मध्ये, ब्लेसिंग मुझारबानीने इस्लामाबाद युनायटेड सोडून कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, तर दासुन शनाका लाहोर कलंदर्स सोडून राजस्थान रॉयल्समध्ये सामील होण्याची तयारी करत आहे. यामुळे मोहसिन नक्वी संतापले असून त्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत.
नक्वी म्हणाले, आम्ही नियमांनुसार त्या क्रिकेटपटूंवर कारवाई करू. गेल्या वर्षीही असेच एक प्रकरण समोर आले होते आणि यावेळीही तसेच होईल. आयपीएलसोबतचा संघर्ष ही समस्या नाही, कारण आमचे क्रिकेटपटू तिथे जात असतील, तर आमचे सर्वोत्तम क्रिकेटपटू इथेही येत आहेत. आम्ही पीएसएल पुढे ढकलण्याचा धोका पत्करू शकत नाही, कारण वर्षभरात आमच्याकडे दुसरा कोणताही वेळ उपलब्ध नाही.
बॉश गेल्या हंगामात पेशावर झल्मीसाठी 'डायमंड पिक' होता. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला. गुडकेश मोती, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ऑटनील बार्टमन आणि स्पेन्सर जॉन्सन यांच्यासह इतर अनेक क्रिकेटपटूंनीही पीएसएलमधून माघार घेतली आहे. पण त्यापैकी बहुतेकांनी त्यांच्या निर्णयामागे वैयक्तिक कारणे दिली आहेत. पीएसएल २६ मार्च रोजी सुरू होणार आहे, जे आयपीएल सुरू होण्याच्या केवळ दोन दिवस आधी आहे. आयपीएल २८ मार्चपासून खेळवली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे