
पुणे, 22 मार्च (हिं.स.) - पुण्यातील वाघोली, तालुका हवेली येथे पार पडलेल्या 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात अटीतटीचा अंतिम सामना झाला. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडवर 4-2 ने मात केली. या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी झाला. यासह हर्षवर्धनची महाराष्ट्र केसरी गदा पटकावण्याची ही एकूण दुसरी वेळ ठरली. हर्षवर्धन दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी गदा जिंकणारा एकूण सातवा कुस्तीपटू ठरला. तर महेंद्र गायकवाड याचं यंदाही महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न भंग झालं.
या विजयानंतर चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच हर्षवर्धनला 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच हर्षवर्धनाला फॉच्युनर गाडी देऊन सन्मानित केलं गेलं. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याचा 4 लाख रुपयांचा धनादेश आणि स्कॉर्पियो गाडी देण्यात आली.
तसेच माती आणि गादी विभागातील विविध वयोगटातील सूवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूंना एकूण 18 बुलेट देण्यात आल्या. तसेच रौप्यपदक विजेत्या कुस्तीपटूंना स्पेलंडर बाईक देण्यात आली.
महेंद्र गायकवाड याने पहिल्या हाफमध्ये एक गुण मिळवत आघाडी घेतली. यानंतर हर्षवर्धन सदगीर याने एक गुण मिळवत बरोबरी केली. पहिला हाफ संपेपर्यंत 1-1 असा सामना बरोबरीत होता. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्र गायकवाड याला एक्टिव्हिटी टास्क देण्यात आला, यात त्याला गुण मिळवता आला नाही. यामुळे हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. यानंतर हर्षवर्धन सदगीर याने दोन गुण मिळवले. अशा प्रकारे हर्षवर्धन सदगीर याने 4-1 अशी आघाडी मिळवली. यानंतर हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्याने एक गुण महेंद्र गायकवाडला मिळाला. कुस्तीचा वेळ संपला तेव्हा हर्षवर्धन सदगीर याने 4-2 असा विजय मिळवला.
महेंद्र गायकवाड यानं माती विभागातील अंतिम फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला. तर हर्षवर्धन सदगीर यानं जय पाटील याचा गादी विभागातील अंतिम फेरीत केला. यामुळं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड आमने सामने आले.
दरम्यान हर्षवर्धनच्या विजयानंतर त्याचे वडील मुकेश सदगीर यांनी प्रतिक्रिया दिली. “कुस्तीचा खेळ आहे, कुणा एकाला पराभूत व्हावं लागतं. दोघेही काका पवारांच्या तालमीतले आहेत. हर्षवर्धन डबल केसरी व्हायचं असं स्वप्न होतं. आता तो ट्रिपल केसरी होण्याची तयारी करणार आहे”, असं मुकेश सदगीर म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी