सोलापूरमध्ये 107 किलोमीटर लांबीचा नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित; वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा
सोलापूर, 23 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील तांदूळवाडी, वळसंग, बसवनगर, मंद्रुप, कुरूल, कामती आणि मोहोळ या भागांमधून जाणारा नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित आहे. हा मार्ग सध्या मंजुरीच्या टप्प्यात असून त्यासाठी 900 कोटींहून अधिक रक्कमेचे अंदाजपत्रक त
express


सोलापूर, 23 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील तांदूळवाडी, वळसंग, बसवनगर, मंद्रुप, कुरूल, कामती आणि मोहोळ या भागांमधून जाणारा नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित आहे. हा मार्ग सध्या मंजुरीच्या टप्प्यात असून त्यासाठी 900 कोटींहून अधिक रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. नवीन मार्गाची लांबी 107 किलोमीटर आणि रुंदी 10 मीटर असणार आहे. मार्ग पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

या नव्या मार्गाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाने केंद्राच्या रस्तेबांधणी विभागाकडे पाठवला असून, यातील त्रुटी दूर केल्या गेल्या आहेत. त्यामुळे लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

सध्या पुणे आणि मुंबईकडून कर्नाटकातील विजयपूरमार्गे जाणारी जड वाहतूक शहरातून होत असल्याने वाहतुकीसाठी बाह्यवळण मार्ग आवश्यक ठरला आहे. याशिवाय, कर्नाटक व दक्षिण भारतातून येणारी सर्व जड वाहतूक देखील पुणे-सोलापूर महामार्गावरील केगाव बाह्यवळण मार्गाद्वारे जात आहे.

नवीन मार्ग पूर्ण झाल्यानंतर कर्नाटकातून हैदराबादकडे आणि हैदराबादहून कर्नाटकसह इतर ठिकाणी जाणाऱ्या जड वाहनांसाठी हा मार्ग पर्यायी मार्ग म्हणून काम करेल. यामुळे मुंबई-पुणे मार्गावरून हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांना सध्या शहरातील रस्त्यांवरून जाण्याची गरज नसेल, ज्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यास मोठा हातभार लागेल.---------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande