
सोलापूर, 23 मार्च (हिं.स.)।
राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याचा निर्णय २०२३ मध्ये राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जनआरोग्य समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नगरसेवकाला कामकाज करण्याची संधी मिळणार आहे. या संदर्भातील नियमावली आरोग्य विभागाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
आपला दवाखान्यामार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा सुधारून नागरिक/रुग्णांच्या आरोग्यविषयक समस्यांचे गुणात्मक निराकरण केले जाणार आहे. जनआरोग्य समिती महापालिका क्षेत्राकरिता नागरी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचा, तसेच नगरपरिषदा/नगरपंचायती व कटकमंडळे क्षेत्रांकरिता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचा अविभाज्य घटक म्हणून कामकाज करणार आहे. जनआरोग्य समिती नागरी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी/जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीच्या दिशानिर्देशानुसार कामकाज करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड