अमरावतीत २.५ वर्षांच्या बालिकेवर यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया
अमरावती, २४ मार्च (हिं.स.) । अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयामध्ये २.५ वर्षांच्या बालिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभा
अडीच वर्षांच्या बालीके वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट :


अमरावती, २४ मार्च (हिं.स.) । अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयामध्ये २.५ वर्षांच्या बालिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील चौथी यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया ठरली असून, बालिकेला ऐकण्याच्या नव्या जगाची दारे खुली झाली आहेत.

सदर बालिका अडीच वर्षांवरील असल्यामुळे कोणत्याही योजनेत बसत नव्हती. म्हणून शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण निधी अमरावती जिल्हा नियोजन समिती मार्फत उपलब्ध करून देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पुढील एक वर्ष स्पीच थेरपी विनामूल्य दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील ही पहिली शस्त्रक्रिया आहे जिथे शस्त्रक्रियेनंतर स्पीच थेरपीचा लाभही या योजनेतून दिला जात आहे.

बालिका रा. ब्राह्मणवाडा थळी, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती येथील रहिवाशी असून जन्मतः ऐकण्यास असमर्थ होती. दोन वर्षांनंतर तिच्या कुटुंबियांना लक्षात आले की ती ऐकू शकत नाही. प्रारंभी तिला जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे ऑडियोलॉजिस्ट गोपाळ जयवाल यांच्याकडे तपासण्यात आले. त्यानंतर तिला सूपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सर्व तपासण्या पूर्ण केल्यानंतर, तिला ऑडियोलॉजिस्ट लक्ष्मण मोरे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. शेवटी, १६ मार्च २०२६ रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत पारंपारिक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान, जसे स्मार्ट नेव नावाचे वायरलेस उपकरण, वापरण्यात आले.

शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांनी केले. यामध्ये इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी, सूपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी व ENT सर्जन डॉ. मंगेश मेंढे, ऑडियोलॉजिस्ट लक्ष्मण मोरे, बालरोग तज्ञ डॉ. नितीन बर्डिया, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण बागवाले, तसेच इतर वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचारी सहभागी झाले.

शस्त्रक्रियेच्या यशामुळे बालिकेला ऐकण्याची संधी मिळाली असून, पुढील स्पीच थेरपीच्या माध्यमातून तिचा संवाद कौशल्याचा विकासही साधला जाईल. ही शस्त्रक्रिया आणि स्पीच थेरपी पूर्णपणे विनामूल्य रुग्णास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande