
बीड, 24 मार्च (हिं.स.)।भारतमातेला विश्वगुरू पदावर विराजमान करण्यासाठी आणि हिंदू समाजाला संघटित करण्याच्या उदात्त हेतूने आष्टी येथे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विराट हिंदू संमेलन समिती आष्टी मंडळ यांच्या वतीने बुधवार दि. २५ मार्च रोजी हे संमेलन पार पडणार असून, शहरात कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
या भव्य संमेलनाची सुरुवात एका विशाल शोभायात्रेने होणार आहे. बुधवारी दुपारी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या शोभायात्रेला सुरुवात होईल आणि ती मुख्य कार्यक्रमस्थळी म्हणजेच बाजारतळ, आष्टी येथे पोहोचेल. या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे,
यात जामखेड (जि. अहिल्यानगर) येथील बबलू वस्ताद टेकाळे यांचे मल्लखांब पथकही सहभागी होणार असून त्यांच्या चित्तथरारक कसरती पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. आत्मविस्मृती झालेल्या समाजाला स्वतःच्या शक्तीची आठवण करून देणे आणि देशासमोरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वांना एकत्र आणणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रामदास महाराज डोरले हे उपस्थित
राहणार आहेत. देवगिरी प्रांत हिंदू जागरण मंचचे अध्यक्ष अंबादास अंभोरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यासोबतच भारत भूषण पुरस्कार विजेते समाधान (माय) महाराज श्रीगोंदाकर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आष्टी आणि परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी या संमेलनास आणि शोभायात्रेस सहकुटुंब बहुसंख्येने उपस्थित राहावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक 'विराट हिंदू संमेलन समिती, आष्टी मंडळ' यांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis