
लातूर, 24 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, साहित्यिक आणि नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी लातूरमध्ये त्यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी श्रद्धांजली सभेत व्यक्त केली गेली.
दयानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत आणि विचारवंत डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांच्या शोक संदेशांचे वाचन करण्यात आले.
डॉ. नागोराव कुंभार यांनी सांगितले की, सामाजिक न्याय आणि समता या मूल्यांचा आग्रह धरून डॉ. वाघमारे यांचे विचार जपले पाहिजेत, ज्यामुळे भविष्यात पुरोगामी चळवळीला अधिक बळ आणि दिशा मिळेल. सर्वोदय चळवळीचे नेते आणि इतिहास अभ्यासक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी दलित व ग्रामीण साहित्याचा वारसा, वाचन संस्कृती, संविधान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान प्रकल्पाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूरच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. शेषराव मोहिते यांनी म्हटले की, लातूरमध्ये डॉ. वाघमारे यांचे योग्य स्मारक उभारले पाहिजे, कारण त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्न तयार केला.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis