
परभणी, 24 मार्च (हिं.स.) : परभणी जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुडवडा निर्माण झाल्याने हॉटेलधारक कमालीचे अडचणीत आले आहेत.
इराण विरुध्द इस्त्राईल-अमेरिका यांच्यातील पेटलेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर सर्वदूर इंधनाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासणार असे सर्वसाधारण चित्र आहे. त्यामुळेच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरधारक चिंतेत सापडले आहेत.
राज्य व केंद्र सरकारने गॅसचा तुटवडा नाही, असे वारंवार जाहीर केल्यानंतरसुध्दा घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरधारक गोंधळावस्थेतच आहेत. यास्थितीत घरगुती गॅस सिलेंडरचा ऑनलाईन नोंदणी प्रमाणे पुरवठा सुरळीत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरसुध्दा ऑनलाईनने केलेल्या नोंदणीप्रमाणे उपलब्ध होत आहेत, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. परंतु, व्यावसायिक सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांना मागणीप्रमाणे वेळेवर मिळत नाही, असे चित्र आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायिकांनी थेट चूल पेटवूनच खाद्य पदार्थ बनविण्यास सुरुवात केली आहे. परभणी शहरात हे चित्र हळूहळू दिसू लागले आहे. काही हॉटेलधारकांच्या मतानुसार जादा सिलेंडरची मागणी केल्यानंतर सिलेंडर मिळत नाहीत. परंतु, दलालांमार्फत संपर्क साधल्यास आव्वा की सव्वा दराने ते सिलेंडर सहजपणे उपलब्ध होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis