अमरावतीत अग्निशमन विभागाची सविस्तर आढावा बैठक; महत्त्वाचे निर्णय
अमरावती, 24 मार्च (हिं.स.) : अमरावती शहरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारा नागरी विस्तार आणि त्यातून निर्माण होणारी अग्निसुरक्षेची आव्हाने लक्षात घेता अमरावती महानगरपालिकेत अग्निशमन विभागाची सविस्तर आढावा बैठक पार पडली. आयुक्त सौम्या शर्मा चांडक य
अमरावती महानगरपालिकेत अग्निसुरक्षा बळकटीसाठी महत्त्वपूर्ण बैठक; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे कडक निर्देश


अमरावती, 24 मार्च (हिं.स.) : अमरावती शहरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारा नागरी विस्तार आणि त्यातून निर्माण होणारी अग्निसुरक्षेची आव्हाने लक्षात घेता अमरावती महानगरपालिकेत अग्निशमन विभागाची सविस्तर आढावा बैठक पार पडली. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली .

बैठकीत शहरातील अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी अग्निशमन विभागाच्या विद्यमान कार्यपद्धतीचा सखोल आढावा सादर करण्यात आला. मागील काही काळात शहरातील घडलेल्या आगिबाबत, अग्निशमन दलाने केलेल्या कार्यवाही, घटनास्थळी पोहोचण्याचा प्रतिसाद कालावधी व बचावकार्याची परिणामकारकता याबाबत माहिती दिली गेली. आयुक्तांनी आपत्कालीन परिस्थितीत दाखविलेल्या तत्परतेबाबत समाधान व्यक्त केले.

शहरातील उंच इमारती, व्यापारी संकुले, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, याची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. अग्निशमन उपकरणांची उपलब्धता, वेळोवेळी तपासणी व देखभाल यावर विशेष भर देण्यात आला. तसेच, विभागासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मनुष्यबळ, रिक्त पदे भरणे, कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढविण्याची गरज अधोरेखित केली. आपत्कालीन परिस्थितीत विविध विभागांमध्ये समन्वय प्रभावी राहावा, यासाठी सुसूत्रतेसाठी सूचना देण्यात आल्या.

नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला. शाळा, महाविद्यालये, औद्योगिक आस्थापना तसेच निवासी संकुलांमध्ये प्रात्यक्षिके घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. नागरिकांनी अग्निसुरक्षा नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

शहरातील प्रमुख ठिकाणी अग्निशमन केंद्रांची संख्या वाढविणे, नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करणे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेवा अधिक गतिमान व प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande