
परभणी, 24 मार्च (हिं.स.)। परभणी जिल्हा परिषदेंतर्गत चार विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीकरीता 2 एप्रिल रोजी जिल्हा परिषद सदस्यांची जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन महायुतीतील मित्र पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन केली. अध्यक्षपद भाजपाच्या तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या हिश्श्यास गेले. त्याद्वारे या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच झेंडा फडकविला. या पार्श्वभूमीवर आता अर्थ, शिक्षण-आरोग्य, बांधकाम व समाजकल्याण या विषय समित्यांच्या सभापती पदाकरीता 2 एप्रिल रोजी निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीतून सुध्दा भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्षच चारही विषय समित्यांवरील सभापती पदे पटकावणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता या दोन पक्षातून कोणत्या सदस्यास संधी मिळणार याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. त्याद्वारे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन सत्तारुढ पक्षावर जोरदार टिका टिप्पणी केली. त्यामुळे चार विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवड बैठकीत सुध्दा शिवसेना शिंदे गट हा बहिष्कार कायम राखेल, असे सकृतदर्शनी चित्र आहे. त्यामुळेच काँग्रेस, शिवसेना उबाठा बरोबर शिवसेना शिंदे गट विरोधी पक्षात बसवणार असे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis