
बीड, 24 मार्च (हिं.स.)। धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेश येथील धनगर समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात मुंबईकडे प्रस्थान केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत ताशांच्या गजरात प्रदक्षिणा काढण्यात आली. “येळकोट येळकोट जय मल्हार”, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो”, “दिपकभाऊ तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
समाज बांधवांनी सरकारकडे मागणी करताना सांगितले की, कोर्ट-कचेरी व समित्यांच्या प्रक्रियेत न अडकता धनगर आणि धनगड हे एकच असल्याचा शासन निर्णय तातडीने घ्यावा. तसेच राज्यपालांच्या स्वाक्षरीसह शिफारस पत्र राष्ट्रपतींकडे पाठवून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा. दिपकभाऊ बो-हाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवून त्यांचा जीव वाचवावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात राजेभाऊ आप्पा गिरे, बाळासाहेब मुळे, गणपत तागड, रामकिसन गिरे, शहादेव धलपे, संदीप मुळे, रामदास मुळे, बंकट विश्वंभर मुळे, प्रविण मुळे, प्रकाश मुळे आदी सहभागी झाले होते.यावेळी अठरापगड जातीतील समाजबांधवही मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शवित होते. मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, बाळकृष्ण थोरात, हरिओम क्षीरसागर, शिवाजी रणखांब, तुकाराम गायकवाड, अरुण निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis