गॅस टंचाईवर केरोसीनचा पर्याय ठरतोय अपुरा; अमरावतीत अद्याप पुरवठा नाही
अमरावती, 24 मार्च (हिं.स.) : आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस सिलिंडर टंचाईवर पर्याय म्हणून राज्य सरकारने केरोसीन पुरवठ्याचा घेतलेला निर्णय प्रत्यक्षात अद्याप अमलात आलेला नाही. पेट्रोल पंपांवरून केरोसीन उपलब्ध करून देण्याची घोषणा अन्न
केरोसीन उपलब्धतेची निव्वळ घोषणाच पुरवठा नाही ः जिल्ह्यातून तीन लाख ६५ हजार लिटरची मागणी


अमरावती, 24 मार्च (हिं.स.) : आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस सिलिंडर टंचाईवर पर्याय म्हणून राज्य सरकारने केरोसीन पुरवठ्याचा घेतलेला निर्णय प्रत्यक्षात अद्याप अमलात आलेला नाही. पेट्रोल पंपांवरून केरोसीन उपलब्ध करून देण्याची घोषणा अन्नधान्य पुरवठा विभागाने केली असली तरी, जिल्ह्यातील कोणत्याही पंपावर अद्याप केरोसीन उपलब्ध झालेले नाही.

गॅस टंचाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांसमोर आता चुली पेटविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. विशेषतः अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारक लाभार्थ्यांना हा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात एकूण 3 लाख 64 हजार 895 कार्डधारक केरोसीनसाठी पात्र आहेत. त्यामध्ये अंत्योदय गटातील 1 लाख 11 हजार 445 आणि प्राधान्य गटातील 2 लाख 53 हजार 450 लाभार्थ्यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांना प्रति कार्ड एक लिटर केरोसीन देण्याची घोषणा मंत्री ना. छगन भूजबळ यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून केरोसीनचा वापर बंद झालेल्या परिस्थितीत, गॅस टंचाईमुळे पर्यायी इंधन म्हणून ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, एका महिन्यासाठी प्रति कार्ड एक लिटर केरोसीन अपुरा ठरणार असतानाही, तोही पुरवठा अद्याप सुरू झालेला नाही.

अन्नधान्य पुरवठा विभागाने 17 मार्च रोजी शासनाकडे 3 लाख 65 हजार लिटर केरोसीनची मागणी नोंदविली आहे. शहरी भाग वगळून केवळ ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना हा पुरवठा करण्यात येणार आहे. नगरपरिषद व महापालिका क्षेत्र योजनेतून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, अंत्योदय गटातील काही लाभार्थ्यांना मिळणारा उज्ज्वला गॅसही सध्या उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. गॅस नाही आणि केरोसीनही नाही, अशा परिस्थितीत लाभार्थी केरोसीनच्या प्रतीक्षेत आहेत.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande