महावितरणमधील गैरव्यवहारांच्या तक्रारींची सखोल चौकशी होणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी, 24 मार्च (हिं.स.) : महावितरणच्या विविध परिमंडळांमध्ये कंत्राटदाराकडून झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली. महावितरणच्या बारामती, पुणे, नाश
महावितरणमधील गैरव्यवहारांच्या तक्रारींची सखोल चौकशी होणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर


परभणी, 24 मार्च (हिं.स.) : महावितरणच्या विविध परिमंडळांमध्ये कंत्राटदाराकडून झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली.

महावितरणच्या बारामती, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर परिमंडळांत आर. एन. इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदाराकडून बनावट बिलिंग, आर्थिक अपहार तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अपघात झाल्याच्या तक्रारी सदस्य महेश सावंत यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडल्या. या चर्चेत सदस्य राजू तोडसाम, अभिजित पाटील आणि प्रशांत बंब यांनीही सहभाग घेतला.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, आतापर्यंत झालेल्या प्राथमिक चौकशीत संबंधित कंत्राटदाराविरुद्ध ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत. ज्या ठिकाणी या एजन्सीने काम केले आहे, तेथे अपघात झाल्याची नोंदही आढळलेली नाही. तसेच, कोल्हापूर परिमंडळात या एजन्सीला काम देण्यात आलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तथापि, सदस्यांनी उपस्थित केलेल्या विशिष्ट तक्रारींचा पुनर्विचार करून त्यावर सखोल चौकशी केली जाईल. आवश्यक असल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

महावितरणकडून सर्व कामांची वेळेत पूर्तता व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातो. अपघातांच्या घटनांमध्ये संबंधितांना मदत देण्याची कार्यवाहीही केली जाते, अशी माहिती त्यांनी दिली. नियमांनुसार पात्र एजन्सींनाच मान्यताप्राप्त (नोंदणीकृत) यादीत समाविष्ट करून कामे दिली जातात. संबंधित एजन्सीलाही त्याच प्रक्रियेनुसार काम देण्यात आले आहे. तसेच, सदस्यांनी उल्लेख केलेल्या दोन अपघातांच्या घटनांमध्ये संबंधित कंत्राटदाराने कामच केलेले नसल्याने त्यांना जबाबदार धरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पॉवर ट्रान्सफॉर्मर व ब्रेकरसारखे महत्त्वाचे साहित्य महावितरणकडूनच पुरवले जाते, तर स्थानिक पातळीवरील किरकोळ साहित्य कंत्राटदारांकडून वापरले जाते, असेही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande