
जेरूसलेम , 24 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजनैतिक घडामोड समोर आली आहे. इस्रायली मीडियाने दावा केला आहे की, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई अमेरिका सोबत चर्चेसाठी तयार आहेत. या अहवालानुसार इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि अमेरिकेचे मध्यस्थ स्टीव विटकॉफ यांच्यात चर्चा झाली असून, इराणमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली होती.मात्र यापूर्वी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांना फेटाळून लावले होते. त्यांनी सांगितले होते की, गेल्या २४ दिवसांपासून तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी स्ट्रेट ऑफ होर्मुज लवकरच पुन्हा खुले होणार असल्याचे सांगितले. हा जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग मानला जातो. याचे व्यवस्थापन अमेरिका आणि इराण संयुक्तपणे करू शकतात, असेही त्यांनी सुचवले. फ्लोरिडामध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, तेहरानसोबतची चर्चा यशस्वी ठरल्यास हा जलमार्ग लवकरच सुरू केला जाईल.
स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून दररोज सुमारे १५ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि ५ दशलक्ष बॅरल तेलजन्य उत्पादने वाहतूक केली जातात. जागतिक सागरी तेल व्यापारातील सुमारे २५ टक्के हिस्सा या मार्गावर अवलंबून आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे हा जलमार्ग धोकादायक बनला आहे.
यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि ऊर्जा केंद्रांवर कोणतीही लष्करी कारवाई पाच दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश दिले होते. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेहरानसोबत राजनैतिक संवाद सुरू असल्याचे कारण यामागे देण्यात आले होते.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये म्हटले की, अमेरिका आणि इराण यांच्यात मागील दोन दिवसांत अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली आहे. या चर्चेचा उद्देश प्रदेशातील परस्पर वैर कमी करणे हा आहे. त्यांनी या चर्चांना सखोल, विस्तृत आणि रचनात्मक असे संबोधले असून, संवाद संपूर्ण आठवडाभर सुरू राहील असेही सांगितले.
ही महत्त्वाची घडामोड अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. या संघर्षाचे दूरगामी परिणाम पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशाबाहेरही जाणवू लागले आहेत. जागतिक ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढली असून, पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत तसेच नागरी, लष्करी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode