परभणीत गुटखा विरोधी कारवाईत 9 जण गजाआड; 8.42 लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी, 24 मार्च (हिं.स.) : पोलीस परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करत पाच ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत नऊ जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 8 लाख 42 हजार 90 रु
परभणीत गुटखा विरोधी कारवाईत 9 जण गजाआड; 8.42 लाखांचा मुद्देमाल जप्त


परभणी, 24 मार्च (हिं.स.) : पोलीस परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करत पाच ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत नऊ जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 8 लाख 42 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील बोरी, नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर व मुखेड, लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण तसेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकण्यात आले. विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गुटखा व इतर साहित्य जप्त करण्यात आले.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 123 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित खटले सत्र न्यायालयात चालविण्यात येणार आहेत. दोषी आढळल्यास आरोपींना दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ ही हेल्पलाईन सुरू केली असून 9150100100 या क्रमांकावर नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande