
छत्रपती संभाजीनगर, २४ मार्च (हिं.स.) : उन्हाळी सुट्यांपूर्वी रेल्वे आरक्षण फुल्ल होत असूनही, दक्षिण मध्य रेल्वेने छत्रपती संभाजीनगरमार्गे कोणतीही उन्हाळी विशेष रेल्वे जाहीर केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप वाढत आहे.
एप्रिल-मेमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते, मात्र मार्च अखेर येत असतानाही विशेष रेल्वेंबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मुंबई, नांदेड, हैदराबादकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गांवर गर्दी अधिक असून, अनेक प्रवाशांचे आरक्षण वेटिंगमध्ये अडकले आहे.
मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसचे आरक्षण सध्या वेटिंगवर आहे, तर सचखंड एक्स्प्रेसचेही आरक्षण भरले आहे. यावर्षी नांदेड आणि संभाजीनगर शहरातून एकही विशेष रेल्वे सुरू केलेली नाही.
सामाजिक कार्यकर्ते मयांक पांडे यांनी मागणी केली की, नांदेड-बिकानेर एक्स्प्रेस परभणी-मनमाड मार्गे सुरू करणे गरजेचे आहे. तसेच उन्हाळी विशेष रेल्वे म्हणून नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, नांदेड-कोल्हापूर साप्ताहिक एक्स्प्रेस, नांदेड-अयोध्या साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करावी. याशिवाय, संभाजीनगर ते नागपूर दरम्यान एकही विशेष रेल्वे उपलब्ध नाही, त्यामुळे लवकरात लवकर रेल्वेकडून विशेष रेल्वेची घोषणा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis