परभणीत नववीच्या मराठी प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या चुका; विद्यार्थी गोंधळले, कारवाईची मागणी
परभणी, 24 मार्च (हिं.स.) : इयत्ता नववीच्या द्वितीय सत्राच्या परीक्षेदरम्यान जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाने पुरविलेल्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत मोठ्या प्रमाणावर शुद्धलेखनाच्या चुका आढळून आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले
अ


परभणी, 24 मार्च (हिं.स.) : इयत्ता नववीच्या द्वितीय सत्राच्या परीक्षेदरम्यान जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाने पुरविलेल्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत मोठ्या प्रमाणावर शुद्धलेखनाच्या चुका आढळून आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराबाबत मंडळाकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

चालू शैक्षणिक वर्षातील द्वितीय सत्राच्या परीक्षा सध्या सुरू असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील अनेक खाजगी शैक्षणिक संस्थांना प्रश्नपत्रिका मंडळामार्फत पुरविण्यात आल्या. नववीच्या मराठी विषयाच्या 80 गुणांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती आल्यानंतर त्यातील अनेक शुद्धलेखनाच्या चुका स्पष्टपणे दिसून आल्या.प्रश्न क्रमांक 1 (अ) अंतर्गत दिलेल्या उताऱ्यातच सुमारे 50 हून अधिक शुद्धलेखनाच्या चुका असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थी पूर्णतः गोंधळून गेले आणि त्यांनी परीक्षकांकडे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मराठी विषयाच्या शिक्षकांनाही ही बाब प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर लक्षात आली.

या संदर्भात काही सतर्क शिक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान, या घटनेची जिल्हाभरात शैक्षणिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.-------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande