
परभणी, 24 मार्च (हिं.स.) : जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर जुन्या जलस्त्रोतांचे पुनर्जीवन व बळकटीकरण करणे ही जलमित्रांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे जलमित्र प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष इंजि. शंकर आजेगावकर यांनी येलदरकर कॉलनीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर सभागृहात आयोजित जलसप्ताह अंतर्गत जलपूजन कार्यक्रमात प्रतिपादन केले.
कार्यक्रमास आयएमएचे अध्यक्ष डॉ. कालिदास चौधरी, आयुर्वेद व्यासपीठाचे डॉ. रवी भंडारी, जैन संघटनेचे झेड.आर. मुथा, ‘नमामि गंगे’चे महाराष्ट्र संयोजक विलास कौसडीकर, लायन्स क्लबचे उदय जैन, वृक्षवल्ली ग्रुपचे डॉ. संजय बंगाळे, स्वच्छ परभणीचे किरण नांदापूरकर, सुभाष जावळे, डॉ. राजगोपाल कालानी, बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी पाणी बचतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तसेच, येलदरकर कॉलनीतील पुरातन विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमासाठी पहिला निधी विलास कौसडीकर यांनी जलमित्रांकडे सुपूर्त केला. उपेंद्र दुधगावकर यांनी जलप्रतिज्ञा देऊन उपस्थितांना ‘जलमित्र’ म्हणून जोडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. राजगोपाल कालानी यांनी केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis