
सोलापूर, 25 मार्च (हिं.स.)।
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावर मराठा समाजाला संधी न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे आगामी काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेवर तब्बल ३२ वर्षांनंतर मराठा समाजाला महापौर पदाची संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या पदावर ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराची निवड करण्यात आल्याने मराठा समाजावर राजकीय अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर जाधव हे काही दिवसांपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यविरोधात राम जाधव यांनी दिलेली प्रतिक्रिया समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या ४५ दिवसांपासून विविध आंदोलनांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही ठोस निर्णय न झाल्याने नाराजी कायम आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर मराठा समाजाला संधी देऊन हा वाद शमवला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्या ठिकाणीही मराठा समाजाच्या पदरी निराशाच पडल्याने असंतोष अधिकच वाढला असल्याची भूमिका जाधव यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड