प्रेरणादायी महिला उद्योजिका: रेणापूरच्या सुनीता कावळे यांचा यशस्वी प्रवास
लातूर, 25 मार्च (हिं.स.) : व्यक्तीच्या क्षमतांना योग्य मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ आणि संधींचा आधार मिळाला तर ती स्वतःच्या यशाच्या वाटचालीतून इतरांसाठी प्रेरणा देणारी दिशादर्शक ठरते. याचे सजीव उदाहरण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रेणापूरच
उमेद


लातूर, 25 मार्च (हिं.स.) : व्यक्तीच्या क्षमतांना योग्य मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ आणि संधींचा आधार मिळाला तर ती स्वतःच्या यशाच्या वाटचालीतून इतरांसाठी प्रेरणा देणारी दिशादर्शक ठरते. याचे सजीव उदाहरण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रेणापूरच्या मीराबाई स्वय सहायता संघाच्या सुनीता अशोक कावळे, ज्या अन्नपूर्णा फूड अँड प्रॉडक्ट्स या स्वतःच्या उद्योगाद्वारे आर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासात यशस्वी ठरल्या आहेत.

सुनीता कावळे यांनी फक्त ५०० रुपयांच्या भांडवलावर २०१७ साली व्यवसाय सुरू केला. आज अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट्सची उलाढाल ९ लाख रुपयांपर्यंत पोहोचली असून, त्यांनी ११ प्रकारची आवळ्याची उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी आवळ्यापासून कँडी, मुरंबा, चूर्ण, लोणचं यासारखी उत्पादने स्वतःच्या हातांनी तयार केली.त्यांच्या मेहनतीला २०१९ मध्ये उमेद (एमएसआरएलएम) अभियानाच्या माध्यमातून व्यावसायिक कौशल्य आणि ब्रँडिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग या बाबींचे प्रशिक्षण मिळाले. महालक्ष्मी सरस प्रदर्शनात त्यांनी आपल्या उत्पादनांची विक्री करून १२ लाख रुपयांचा महसूल मिळविला, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन दालन खुले झाले.

सुनीता यांना शासनाच्या पीएमएफएमई योजनांतर्गत अनुदान, मशिनरी आणि पॅकेजिंग युनिटसाठीही मदत मिळत आहे. भविष्यात ‘अन्नपूर्णा’ ब्रँड संपूर्ण भारतात पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.स्वावलंबनाचे संदेश देत सुनीता यांनी विशेषतः विधवा, परित्यक्ता आणि गरजू महिलांना व्यवसायाचे मार्गदर्शन केले आहे. ‘अन्नपूर्णा’ ही फक्त फूड ब्रँड नाही, तर महिला स्वाभिमान आणि आर्थिक स्वावलंबनाचे व्यासपीठ आहे.वंदना थोरात, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या माहितीप्रमाणे, सुनीता कावळे यांचा हा प्रवास निश्चितच यशस्वी महिला उद्योजिकांसाठी प्रेरणादायी ठरतो.

------------------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande