पीटीपी’ अॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड
पुणे, 25 मार्च, (हिं.स.)। शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी’ (पुणे ट्रॅफिक पोलिस) अॅपच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई केली जात आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख नागरिकांनी ॲपद्वारे तक्रारी केल्या
CP Pune


पुणे, 25 मार्च, (हिं.स.)। शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी’ (पुणे ट्रॅफिक पोलिस) अॅपच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई केली जात आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख नागरिकांनी ॲपद्वारे तक्रारी केल्या असून, सुमारे नऊ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शहर वाहतूक शाखेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात ‘पीटीपी’ अॅपद्वारे सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या व्यक्तींचा गौरव २३ मार्च रोजी पोलिस आयुक्तालयात करण्यात आला. या वेळी विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. या योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाला ५० हजार, द्वितीय २५ हजार, तृतीय १५ हजार, चतुर्थ १० हजार आणि पाचव्या क्रमांकाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच, अॅपवर प्राप्त तक्रारींवर प्रभावी कारवाई करणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव उपस्थित होते.

वाहतूक शाखेच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे एक लाख ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी ‘पीटीपी’ अॅपचा वापर केला आहे. या ॲपद्वारे दोन लाख ४९ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची पडताळणी करून एक लाख ७६ हजारांपेक्षा अधिक प्रकरणांमध्ये सुमारे नउ कोटी ३२ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.पुणे महापालिका आणि शहर पोलिस यांच्या वतीने ‘होर्डिंगमुक्त पुणे’ अभियान हाती घेण्यात आले आहे. विशेष मोहीम राबवून अनधिकृत होर्डिंग, रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी ‘पीटीपी’ अॅपचा वापर करून वाहतूक नियमभंग, बेकायदेशीर होर्डिंग, पार्किंग आणि अडथळे निर्माण करणाऱ्या बाबींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande