
सोलापूर, 25 मार्च (हिं.स.)।
नाशिकच्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यांनी संपूर्ण देश हादरुन गेला आहे. अशोक खरात सारखे असंख्य लहान मोठे ‘कॅप्टन’ संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहेत. सोलापूर शहर आणि जिल्हाही त्याला अपवाद नाही. सर्वच धर्मामध्ये अशा प्रकारच्या बाबांचे पेव फुटले आहे. सोलापुरातही राजकीय पद, पैसे, व्यापारात यश, भावकीतील वाद, मुलामुलींचे लग्न यासाठी अशा बाबांकडे जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा बाबांमुळे अनेक घरे उद्ध्वस्त होत आहेत.
लोकांच्या अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा आणि मानसिक कमकुवतपणाचा फायदा घेऊन भोंदू बाबांचा उदय होतो. हे लोक ज्योतिष, चमत्कार किंवा दैवी शक्तीचे खोटे दावे करून, लोकांना उपाय (तोडगे) सांगण्याच्या बहाण्याने भुलवतात. ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली चालणाऱ्या या कृत्यांमुळे भोंदूगिरी फोफावते.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही अशा भोंदू बाबांचे पेव फुटले आहे. अशा बाबांकडे जाणाऱ्या नागरिकांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंदूंबरोबरच मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातही असे अनेक बाबा तयार होत आहेत.बाबांकडे जाण्यासाठी महिलांचे ग्रुप तयार झाल्याचे पहायला मिळते. सोलापुरातील अशा बाबांना आता चाप लावण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी अशा बाबांच्या मुसक्या आवळण्यासाठी सुजाण नागरिकांनी समोर येण्याची गरज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड