
वॉशिंग्टन , 25 मार्च (हिं.स.)।मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा आज 26वा दिवस असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘5 डे नो अटॅक’ धोरणाचा परिणाम दिसू लागला आहे. ट्रम्प हे इराणसोबतचे युद्ध संपवून प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, इराणने करार मान्य केला नाही तर त्याला मोठे नुकसान सहन करावे लागेल. ट्रम्प यांच्या मते, युद्ध समाप्तीच्या बदल्यात अमेरिकेला तेल आणि वायू क्षेत्रात मोठा फायदा होत आहे. दरम्यान, इराणही या कराराबाबत उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
गृह सुरक्षा मंत्र्यांच्या शपथविधी समारंभात बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असून इराण करार करण्यास इच्छुक आहे. त्यांनी असेही म्हटले की इराणची जुनी लष्करी ताकद जवळपास संपुष्टात आली असून नव्या नेतृत्वासोबत चर्चा सुरू आहे. मात्र, इराणने अमेरिकेला स्पष्ट केले आहे की ते ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ किंवा जॅरेड कुशनर यांच्याशी चर्चा करू इच्छित नाहीत. त्याऐवजी, त्यांना अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासोबत थेट चर्चा करणे अधिक पसंत आहे, कारण त्यांचा दृष्टिकोन तुलनेने मवाळ मानला जातो.
ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करारासाठी 15 सूत्रीय आराखड्याचा उल्लेख केला असला तरी त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. दरम्यान, इराणने इस्रायलमधील विविध भागांवर तसेच खाडी देशांतील अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले असून त्यामध्ये क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने इस्फहान येथील क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र तसेच तेहरान–बेइरूत मार्गावरील काही ठिकाणांना लक्ष्य केले आहे. दोन्ही बाजूंना मोठ्या नुकसानीच्या बातम्या समोर येत असल्या तरी ट्रम्प यांचे शांतता कराराचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode