इराणचा 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४' चा ८३ वा टप्पा सुरू, इस्रायल - अमेरिकन तळांवर भीषण हल्ले
तेहरान , 27 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियाची भूमी पुन्हा एकदा युद्धाच्या ज्वाळांनी पेटली आहे. शुक्रवारी पहाटे इराणने भीषण हल्ले करत आपण मागे हटण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्स (आयआयजीसी) यांनी ‘ऑपरेशन ट्रू प्रॉ
इराणचा 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४' चा ८३ वा टप्पा सुरू, इस्रायल - अमेरिकन तळांवर केले भीषण हल्ले


तेहरान , 27 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियाची भूमी पुन्हा एकदा युद्धाच्या ज्वाळांनी पेटली आहे. शुक्रवारी पहाटे इराणने भीषण हल्ले करत आपण मागे हटण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्स (आयआयजीसी) यांनी ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४’ अंतर्गत ८३वा टप्पा सुरू केला आहे. यावेळी इराणी सैन्याने केवळ इस्रायललाच लक्ष्य केले नाही, तर आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांनाही निशाणा बनवले आहे.

इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, आयआरजीसीने आधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि सुसाइड ड्रोनच्या मदतीने इस्रायलमधील अशदोद येथील तेल साठा केंद्रावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर तेथे मोठी आग लागल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय इस्रायलच्या लष्करी तळांवरही अचूक हल्ले करण्यात आले आहेत. अहवालांनुसार, इराणने थेट अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य केले आहे. कुवैतमधील अली अल-सलेम एअरबेस आणि बहरीनमधील शेख ईसा एअरबेसवर इराणी क्षेपणास्त्रे कोसळल्याची माहिती आहे. बहरीनमध्ये पॅट्रियट मिसाइल सिस्टीमच्या दुरुस्ती हॅंगर आणि जेट इंधन साठ्यांना मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच कुवैत आणि यूएईमधील अल-धाफरा एअरबेसवरही इराणी ड्रोनने लष्करी साहित्याला लक्ष्य केले आहे.

अलीकडेच नौदल प्रमुख रियर अॅडमिरल अलीरेजा तंगसिरी यांच्या मृत्यूनंतर इराण संतप्त झाला आहे. इस्रायली हल्ल्यात तंगसिरी यांचा मृत्यू झाला होता आणि त्याचाच बदला म्हणून हे हल्ले केल्याचे सांगितले जात आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या निधनानंतर सुरू झालेला हा संघर्ष आता जागतिक संकटाचे रूप धारण करत आहे. इराणने होर्मुज सामुद्रधुनी जवळपास बंद केल्याचेही सांगितले जात आहे.

याचा परिणाम म्हणून जगभरातील तेलपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेने ६ एप्रिलपर्यंत तेल साठा केंद्रांवर हल्ले न करण्याची भूमिका जाहीर केली असली, तरी प्रत्यक्ष परिस्थिती त्याच्या उलट असल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांच्या मते, हा संघर्ष थांबला नाही तर येत्या काळात तेल आणि वायूच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande