
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर, 27 मार्च (हिं.स.) : मालाबार गोल्ड अँड डायमंड या जागतिक स्तरावर अग्रगण्य ज्वेलरी समूहाने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 200 कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांची घोषणा केली आहे. या उपक्रमांचे उद्घाटन पियूष गोयल, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री यांच्या हस्ते नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडले.
या कार्यक्रमात देशभरातील 33 हजार मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्याच्या महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मालाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद व्यवस्थापकीय संचालक ओ. अशर, कार्यकारी संचालक निषाद ए. के. आणि अब्दुल्ला इब्राहिम यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना पियूष गोयल यांनी सांगितले की, हे उपक्रम ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मोहिमेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले.
या सीएसआर योजनेअंतर्गत देशातील 19 राज्यांमधील 3000 पेक्षा अधिक ठिकाणी 15 विविध उपक्रम राबवले जाणार असून, याचा लाभ सुमारे 2 लाखांहून अधिक लोकांना होण्याची अपेक्षा आहे. शिक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक 114 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी सूक्ष्म शिक्षण केंद्रे आणि मुलींसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश आहे. याशिवाय ‘भूकमुक्त जग’ प्रकल्पासाठी 30 कोटी रुपये, आरोग्यसेवांसाठी 14.2 कोटी रुपये, तसेच निराधार महिलांसाठी ‘ग्रॅंडमा होम’सारख्या प्रकल्पांसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी 10 कोटी रुपये आणि इतर सामाजिक उपक्रमांसाठी 6.8 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
मालाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद यांनी सांगितले की, “मानव संसाधन विकास हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे. शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे अत्यंत आवश्यक आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, कंपनी दीर्घकालीन सामाजिक परिणाम साधण्यासाठी कटिबद्ध आहे.
मालाबार चॅरिटेबल ट्रस्टमार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे आतापर्यंत 18 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला असून, भविष्यातही हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार आहे. -------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis