
बंगळुरु, 27 मार्च (हिं.स.)। बायोकॉन लिमिटेड (BSE: 532523; NSE: BIOCON) कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर श्रीहास तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या नामनिर्देशन व वेतन समिती तसेच संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर आज श्रीहास तांबे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक पदाची नियुक्ती जाहीर करण्यात आली. श्रीहास तांबे १ एप्रिल २०२६ पासून पदभार स्विकारतील. एकात्मिक बायोकॉनचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कंपनीच्या बायोसिमिलर्स आणि जनरिक औषध व्यवसायांच्या एकत्रितकरणाचे नेतृत्व करतील. त्यांच्या नियुक्तीमुळे कंपनीच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला. श्रीहास तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सक्षम नेतृत्वगुणामुळे कंपनीला जागतिक बाजारपेठेतील पकड मजबूत करता येईल, स्पर्धेच्या युगात प्रभावीपणे सेवा देता येईल, असे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले.
केदार उपाध्ये यांची बायोकॉन लिमिटेडच्या मुख्य वित्तीय अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
नेतृत्वात बदल करणे हे बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेड या उपकंपनीला बायोकॉन लिमिटेडच्या मालकीची उपकंपनी म्हणून समाविष्ट करण्याचा धोरणात्मक निर्णय आहे. या बदलांमुळे कंपनीची कॉर्पोरेट रचना योग्य रित्या पुनर्रचित होत, सोपी आणि एकसंध झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनीच्या दाव्यानुसार, या एकत्रितकरणामुळे मधुमेह, स्थूलता, कर्करोग या घातक आजारांविरोधात लढण्यासाठी कंपनीच्या कार्यपद्धती सक्षम झाल्या आहेत. या आजारांना प्रतिबंध यावा याकरिता माणसाच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढावी याकरिता कंपनीच्या धोरणात्मक यशस्वी नियोजनपद्धती सुरु झाल्या आहेत. बायोसिमिलर्स, इन्सुलिन, गुंतागुंतीची जनरिक औषधे आणि पेप्टाइड्स यांचा समावेश असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओच्या माध्यमातून, जीएलपी-१ उपचारांसह कंपनीने प्रभावी उपचारपद्धतींवर लक्ष केंद्रित केले आहे.
कंपनीतील नव्या नेमणूकांबाबत बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मजूमदार-शॉ यांनी कंपनीची भूमिका मांडली. त्या म्हणाल्या,” बायोकॉन रुग्णांच्या गरजांबाबत जागरुक असते. त्यामुळे रुग्णांसाठी बायोकॉनने काळाच्या पलीकडे झेप घेत आपली प्रगती साधली आहे. आमच्या जनरिक आणि बायोसिमिलर व्यवसायांच्या एकत्रीकरणामुळे जागतिक स्तरावर बायोफार्मा कंपनीचे नाव वाखाणले जात आहे. आंतरराष्टीय स्तवरावर नावाजलेली कंपनी म्हणून बायोकॉनला आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले आहे. या परिवर्तनास श्रीहास तांबे यांचे सक्षम नेतृत्व कामी आले. तांबे यांनी व्हायाट्रिसच्या बायोसिमिलर व्यवसायाच्या अधिग्रहण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडली. व्यवसायांचे एकत्रिकरण सुलभरित्या पूर्ण केले. त्यांच्या नेतृत्वाअंतर्गत कंपनीचा जागतिक पातळीवर यशस्वीरित्या विस्तार होऊ लागला. हे सर्व धोरणात्मक टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे बायोकॉन बायोलॉजिक्स कंपनी जगातील अव्वल पाच बायोसिमिलर कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून उदयास आली आहे. या कंपनीचे मूल्यांकन सध्या ५.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. एकसंध व्यवसायाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाकरिता श्रीहास यांच्याकडे सखोल वैज्ञानिक ज्ञान, धोरणात्मक दृष्टीकोन आणि परवडणारी आरोग्यसेवा पुढे नेण्याची दृढ बांधिलकी आदी नेतृत्व गुण आहेत. त्यांच्या पुढाकारातून कंपनीतील धोरणांची शिस्तबद्ध अंमलबजावणी होईल. कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दीर्घकाळासाठी अग्रगण्य स्थानावर राहील, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
सिद्धार्थ मित्तल यांच्या योगदानाबद्दलही किरण मजूमदार-शॉ यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या,” सिद्धार्थ मित्तल यांनी बायोकॉनसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय योगदानासाठी मी त्यांचे आभार मानते. २०१३ साली सिद्धार्थ मित्तल कंपनीत रुजू झाले. मित्तल यांनी सुरुवातीपासूनच मुख्य वित्त अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अशा महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. कंपनीला प्रगती पथावर नेण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वामुळे बायोकॉनच्या विकासाला आणि विस्ताराला मोठी गती मिळाली. त्यांनी आता बायोकॉन समूहाच्या नव्या नेतृत्वाचा पदभार स्विकारला आहे.”
बायोकॉन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्रीहास तांबे यांनीही नव्या जबाबदारीसह भविष्यातील नियोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, “ बायोकॉनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर मला कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही सन्मानपूर्वक बाब आहे. कंपनीने मला हा विशेषाधिकार देऊ केला आहे. आम्ही बायोलॉजिक्स आणि जेनेरिक्स व्यवसाय एकत्र करुन आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य औषधनिर्मिती कंपनी म्हणून बायोकॉन कंपनीला नावारुपास आणत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करुन जीवनरक्षक उपचारांची उपलब्धता वाढवणा-या निवडक कंपन्यांमध्ये बायोकॉन कंपनीचे नाव घेतले जाते. आमच्या यशामागे प्रतिभावान टीम, उद्दिष्टप्राप्तीची भावना आणि रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्याची बांधिलकी आदी घटक कारणीभूत आहेत. कंपनीचा उत्पादन पोर्टफोलिओ सशक्त होत आहे. जागतिक पातळीवर कंपनीचा विस्तार होत आहे, या प्रक्रियेत कंपनीचा पाया भक्कम करणे, व्यवसायाचे एकत्रितकरण, शाश्वत विकासाला गती देणे या बाबींवर मी प्रयत्नशील राहीन. कंपनीच्या अध्यक्षा किरण मजूमदार-शॉ यांनी दृरदृष्टीकोनातून माझ्यावर विश्वास दाखवला. मी किरण मजूमदार शॉ यांच्यासह आणि संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानतो. बायोकॉनचा हा गौरवशाली वारसा पुढे नेऊन, जगभरातील रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मी तत्पर राहीन.”
श्रीहास तांबे यांचा परिचय –
श्रीहास तांबे मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून तीस वर्षांपूर्वी बायोकॉनमध्ये रुजू झाले होते. या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदा-या समर्थपणे पेलल्या. श्रीहास तांबे यांच्या नेतृत्वातंर्गत कंपनीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. बायोकॉन बायोलॉजिक्सचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालकाची धूरा सांभाळताना तांबे यांनी गेल्या वर्षी २०२५ साली कंपनीचा आर्थिक स्तर उंचावण्यात मोठे योगदान दिले. या वर्षांत कंपनीचे मूल्यांकन ५.५ अब्जापर्यत वाढले. आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्त महसूल गोळा करणा-या पहिल्या पाच बायोसिमिलर कंपन्यांमध्ये बायोकॉन बायोलॉजिक्स कंपनीची वर्णी लागली. श्रीहास तांबे यांनी विआट्रिसचा बायोसिमिलर व्यवसाय विक्री प्रक्रियेत महत्त्वाचे नेतृत्व केले. या प्रक्रियेचे त्यांनी वेगाने एकत्रिकरण घडवून आणले. तांबे यांच्या मार्गदर्शनामुळेच बायोकॉन बायोलॉजिक्स कंपनी ही प्रयोगशाळेच्या वृद्धीपासून ते रुग्णांना उच्च आरोग्यसेवा देणारी जागतिक बायोलॉजिक्स कंपनी म्हणून नावारुपास आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर