
नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.) : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी इंडिगो विमानाचे ‘फुल इमर्जन्सी’ लँडिंग करण्यात आले. विशाखापट्टणमहून दिल्लीकडे येणाऱ्या या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाडाची कल्पना येताच ते विमान आपातकालिन परिस्थित खाली उतरवण्यात आले. दरम्यान विमानतळावरील 28 क्रमांकाच्या धावपट्टीवर (रनवे) ‘फुल इमर्जन्सी’ जाहीर करण्यात आली होती. मात्र, वैमानिकाच्या चातुर्यामुळे आणि विमानतळ प्रशासनाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला.
यासंदर्भातील माहितीनुसार इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाडाची शक्यता लक्षात येताच आपत्कालीन प्रक्रियेदरम्यान हे विमान सकाळी 10:54 वाजता सुरक्षितपणे विमानतळाच्या रनवे क्र. 28 वर उतरवण्यात आले. लँडिंगच्या वेळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या विमानात एकूण 161 प्रवासी होते. लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि तपासणीनंतर त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी रवाना करण्यात आले. इंडिगो प्रशासनाने इंजिनमधील तांत्रिक बिघाडाच्या कारणांची सखोल चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालानुसार, जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान तपासण्यात आलेल्या 754 विमानांपैकी 377 विमानांमध्ये सतत तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आजची घटना ही केवळ योगायोग नसून, विमान सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या चिंतेचा भाग असल्याचे मानले जात आहे.या घटनेमुळे भारतातील नागरी विमानवाहतूक क्षेत्रातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या क्षेत्रात मूलभूत बदलांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. -----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी