
नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.)। केंद्र सरकारने २७ मार्च २०२६ रोजी पेट्रोल आणि डिझेलवर लागू असलेली स्पेशल अॅडिशनल एक्साइज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयानंतर इंधनाचे दर कमी झाले की वाढले याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात ही कपात दर कमी करण्यासाठी नसून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम ग्राहकांवर होऊ नये आणि रिटेल प्राईसेस स्थिर राहाव्यात यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या स्थिरच राहिले असून रोजच्या दरांमध्ये कोणताही मोठा बदल दिसून आलेला नाही.
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पेट्रोलचा दर प्रति लिटर ९४.७७ रुपये असून डिझेल ८७.६७ रुपयांवर कायम आहे. मुंबई मध्ये पेट्रोल १०३.५० रुपये तर डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नई येथे पेट्रोलचा दर १००.८० रुपये असून डिझेल ९२.३९ रुपये आहे, तर कोलकाता मध्ये पेट्रोल १०५.४१ रुपये आणि डिझेल ९२.०२ रुपये प्रति लिटर दराने स्थिर आहे. या चारही महानगरांमध्ये एक्साइज ड्युटी कपातीनंतरही दरांमध्ये कोणतीही घट न होता स्थिरता दिसून येत आहे.
इतर मोठ्या शहरांकडे पाहिले तर बेंगळुरू मध्ये पेट्रोल १०२.९२ रुपये आणि डिझेल ९०.९९ रुपये आहे, तर हैदराबाद येथे पेट्रोल १०७.४६ रुपये आणि डिझेल ९५.७० रुपये दराने मिळत आहे. जयपूर मध्ये पेट्रोल १०४.७२ रुपये आणि डिझेल ९०.२१ रुपये आहे. लखनऊ येथे पेट्रोल ९४.७३ रुपये आणि डिझेल ८७.८१ रुपये दराने विकले जात आहे. चंदीगड मध्ये पेट्रोल ९४.३० रुपये असून डिझेल ८२.४५ रुपये आहे, जे इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे.
पूर्व आणि मध्य भारतातील शहरांमध्येही दर उच्च पातळीवर कायम आहेत. पटना येथे पेट्रोल १०६.११ रुपये आणि डिझेल ९१.७७ रुपये आहे, तर भोपाल मध्ये पेट्रोल १०६.१७ रुपये आणि डिझेल ९१.५७ रुपये दराने उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे पेट्रोल सुमारे १०४ रुपयांच्या आसपास असून डिझेल ९० रुपयांच्या पुढे आहे. गुजरातमधील अहमदाबाद आणि सूरत येथे पेट्रोल अनुक्रमे ९४.४८ आणि ९४.६२ रुपये दराने मिळत आहे, तर डिझेल जवळपास ९० रुपयांच्या आसपास आहे. दक्षिणेकडील विशाखापट्टणम मध्ये पेट्रोल १०८.३५ रुपये आणि डिझेल ९६.२२ रुपये इतके महाग आहे.
एकंदरीत पाहता, केंद्र सरकारच्या एक्साइज ड्युटी कपातीनंतर इंधनाचे दर थेट कमी झालेले नाहीत, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा ताण ग्राहकांवर पडू नये यासाठी दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी भविष्यात जागतिक बाजारातील परिस्थितीनुसार इंधन दरांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नायरा एनर्जीकडून दरवाढ
देशातील नायरा एनर्जीनं बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली होती. तेल कंपनीनं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५.३० रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ केली. कंपनीनं वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकला आहे.
एक्सपोर्ट टॅक्समध्ये वाढ
सरकारनं डिझेलच्या निर्यातीवर प्रति लिटर २१.५० रुपये आणि विमान इंधनावर (ATF) प्रति लिटर २९.५० रुपये निर्यात शुल्क (विंडफॉल टॅक्स) लावलं आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर रिफायनरी कंपन्यांच्या अकल्पित नफ्यावर लगाम लावण्यासाठी जुलै २०२२ मध्ये पहिल्यांदा हा कर लावण्यात आला होता, जो डिसेंबर २०२४ मध्ये हटवण्यात आला होता.
कच्च्या तेलाच्या किमतीत 'भडका'
युद्धामुळे क्रूड ऑईलचे दर गगनाला भिडलेत. गेल्या महिन्यात जे कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलरच्या जवळ होतं, ते आता ११० डॉलरच्या पार गेलं आहे. यामुळे तेल कंपन्यांवरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढलाय.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule