
तेहरान, 29 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने सौदी अरेबियातील अमेरिकन एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात अमेरिकेची अनेक विमाने नष्ट झाल्याचा इराणचा दावा आहे.
इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, या कारवाईत 6 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 29 घातक ड्रोनचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात अमेरिकेचे अत्याधुनिक कमांड अँड कंट्रोल विमान ‘E-3 AWACS’ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणने यासंदर्भातील काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली असून त्यामध्ये विशाल विमानाचा मधला भाग पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसत आहे. तसेच हवेत इंधन भरणाऱ्या रिफ्यूलिंग विमानांनाही मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
इराणच्या म्हणण्यानुसार, या प्रत्युत्तरात्मक कारवाईत किमान 10 अमेरिकन सैनिक जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मात्र, अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (सेंटकॉम) कडून अद्याप या हल्ल्याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणविरोधात लष्करी मोहीम सुरू केल्यानंतर सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअरबेस इराणच्या सततच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इराणने अमेरिकेचा एक MQ-9 रीपर ड्रोन पाडल्याचा आणि F-16 लढाऊ विमानाला नुकसान पोहोचवल्याचा दावाही केला आहे.
दरम्यान, हा संघर्ष आता केवळ तीन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. येमेनमधील हूती बंडखोरांनीही इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती आहे. या संघर्षात सामान्य नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी मिनाब येथे मुलींच्या शाळेवर क्षेपणास्त्र पडल्याने सुमारे 168 निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. इराणने स्पष्ट इशारा देत अमेरिका आणि इस्रायलच्या तळांवर असे हल्ले पुढेही सुरू राहतील, असे म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode