
वॉशिंग्टन , 30 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका विधानामुळे जागतिक राजकारण आणि ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना इराणचे तेल घेणे पसंत आहे आणि गरज पडल्यास अमेरिका इराणच्या प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटावर ताबा मिळवू शकते.
एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या समोर अनेक लष्करी पर्याय उपलब्ध आहेत. “कदाचित आम्ही खार्ग बेट ताब्यात घेऊ, कदाचित नाही… आमच्याकडे अनेक पर्याय आहेत,” असे त्यांनी म्हटले. खार्ग बेट हे इराणचे सर्वात महत्त्वाचे तेल निर्यात केंद्र असून, येथून देशातील बहुतांश कच्चे तेल जगभर पाठवले जाते. त्यामुळे या बेटावर ताबा मिळवणे म्हणजे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का ठरेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रूथ सोशल’वर संदेश शेअर कहरत सांगितले की, इराणमध्ये आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. त्यांनी दावा केला की अमेरिकन सशस्त्र दलांनी दीर्घकाळापासून शोधात असलेली अनेक लक्ष्ये नष्ट केली असून ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांनी अमेरिकन सैन्याचे कौतुक करत ते जगातील सर्वात सक्षम आणि घातक सैन्य असल्याचे म्हटले तसेच सर्वांसाठी देवाच्या आशीर्वादाची प्रार्थनाही केली.
माहितीनुसार, अमेरिका आधीच पश्चिम आशियात आपली लष्करी उपस्थिती मजबूत करत असून सुमारे 10,000 सैनिक तैनात करण्याची योजना आखली आहे. यात मरीन आणि एअरबोर्न डिव्हिजनच्या जवानांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, खार्ग बेटावर हल्ला झाल्यास संघर्ष अधिक धोकादायक व तीव्र होऊ शकतो आणि अमेरिकेलाही मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक प्रयत्नही सुरू आहेत. ट्रम्प यांनी दावा केला की पाकिस्तानमार्फत इराणसोबत अप्रत्यक्ष चर्चा सुरू असून 6 एप्रिलपर्यंत करारासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यांनी इशारा दिला की, करार न झाल्यास अमेरिका इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करू शकते.
पश्चिम आशियातील संकटाचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 116 डॉलर्सच्या पुढे गेली असून, गेल्या महिन्याभरात 50 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, खार्ग बेटावर परिणाम झाल्यास जागतिक पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेला संघर्ष आता अनेक देशांपर्यंत पसरत आहे. अलीकडेच सौदी अरेबियातील अमेरिकन एअरबेसवर हल्ला झाला असून त्यात काही अमेरिकन सैनिक जखमी झाले. तसेच येमेनमधील हूती बंडखोरांनी इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode