
लातूर, 31 मार्च (हिं.स.) : औसा मतदारसंघातील महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत, पहिल्या टप्प्यात ४० गावांमध्ये ‘महिला अस्मिता भवन’ उभारण्यासाठी एकूण १६ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
गावागावांत महिला बचत गट सक्रिय असले तरी त्यांच्या कामकाजासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज जागेचा अभाव जाणवत होता. ही गरज ओळखून ‘ग्रामसंघ इमारत – महिला सक्षमीकरण भवन’ ही संकल्पना मांडण्यात आली. या योजनेअंतर्गत आमदार निधी (१० लाख), जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण निधी (१५ लाख) आणि मनरेगा/रोहयो अभिसरण निधी (१७.२० लाख) अशा तीन स्रोतांतून निधी उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
मात्र, आमदार निधी व जिल्हा योजना निधी अनुज्ञेय नसल्याने हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे प्रलंबित होता. यासाठी डिसेंबरमध्ये तत्कालीन अर्थमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्याकडे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर २४ मार्च २०२६ रोजी अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला विशेष मंजुरी दिली.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच लातूर जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
‘महिला अस्मिता भवन’मध्ये ग्रामसंघ अध्यक्षांसाठी सुसज्ज केबिन, प्रशस्त मीटिंग हॉल, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी दोन गाळे असणार आहेत. यामुळे महिलांना एकाच ठिकाणी बैठक, नियोजन आणि व्यवसायवृद्धीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मूळ प्रस्ताव ९३ गावांसाठी सादर करण्यात आला होता. मात्र, उपलब्ध निधी लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात ४० भवनांना मंजुरी देण्यात आली आहे. एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर उर्वरित ५३ गावांनाही मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
‘औसा पॅटर्न’ अंतर्गत शेतरस्त्यांच्या यशानंतर आता ‘महिला अस्मिता भवन’च्या माध्यमातून बचत गटांना बळकटी देण्याचा नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण टप्पा मानला जात आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis