
बीड, 31 मार्च (हिं.स.)। बीडमधील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ७.१० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अंबाजोगाईतील खोलेश्वर, आम्लेश्वर मंदिरासह जोगाई मंडपाचे संवर्धन होणार आहे.
बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ७ कोटी १० लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उप सचिव नंदा राऊत यांनी २७ आणि ३० मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केले असून यामध्ये परळी, अंबाजोगाई, पाटोदा आणि माजलगाव तालुक्यातील महत्त्वाच्या राज्य संरक्षित स्मारकांचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार परळी येथील ऐतिहासिक धर्मापुरी किल्ल्याच्या जतन आणि दुरुस्तीसाठी सर्वाधिक २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अंबाजोगाई येथील प्रसिद्ध आमलेश्वर मंदिर, खोलेश्वर मंदिर आणि जोगाई सभा मंडपाच्या संवर्धन कामांनाही यामुळे मोठी गती मिळणार आहे. तसेच माजलगावच्या केसापुरी येथील केशवराज मंदिर आणि पाटोदा तालुक्यातील संगमेश्वर महादेव मंदिराच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या देखरेखीखाली ही सर्व कामे पुरातत्वीय निकष पाळून पूर्ण केली जाणार असून यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis