
नांदेड, 31 मार्च (हिं.स.) : माहूर तालुक्यातील मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मॅपिंग मोहिमेला वेग आला असून, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात काम पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप १६ हजारांहून अधिक मतदारांचे मॅपिंग बाकी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
तालुक्यातील ९७ मतदार यादी भागांमधील मतदारांचे २००२ मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरिक्षणातील अंतिम मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम बीएलओमार्फत सुरू आहे. सध्या तालुक्यात ८३,२९५ मतदार नोंदणीकृत असून, त्यापैकी ६७,१९७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित १६,०९८ मतदारांचे मॅपिंग अद्याप प्रलंबित आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एप्रिल महिन्यात देशभर तिसऱ्या टप्प्यातील विशेष सखोल पुनरिक्षण (एसआरआर) राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत विशेषतः २००२ नंतर स्थलांतरित झालेले मतदार, इतर तालुके किंवा जिल्ह्यांतून आलेले नागरिक तसेच विवाहानंतर माहूर तालुक्यात स्थायिक झालेल्या महिलांचा समावेश करण्यात येणार आहे.
प्रशासनाने संबंधित मतदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी २००२ मधील ज्या मतदार यादीत नाव होते त्या संदर्भातील माहिती बीएलओकडे सादर करावी. जर त्या यादीत नाव उपलब्ध नसेल, तर आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्या नावाचा तपशील देणे आवश्यक आहे. यामुळे मॅपिंग प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यांना नायब तहसीलदार कैलाश जेठे, सहायक महसूल अधिकारी प्रभू पानोडे, तांत्रिक सहाय्यक प्रकाश शेडमाके तसेच बीएलओ व पर्यवेक्षक यांचे सहकार्य लाभत आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, स्वस्त धान्य दुकानदार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचेही सहकार्य घेतले जात आहे.
प्रशासनाने उर्वरित मतदारांनी लवकरात लवकर आवश्यक माहिती सादर करून मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis