छ. संभाजीनगर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च (हिं.स.) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते १४ एप्रिल दरम्यान होणा-या या कार्यक्रमास विद्यार्थी विकास मंडळ सल्लागार समितीने घेतलेल्या विविध निर्णयांना व्यवस्थापन परिषदेने मान्यता
छ. संभाजीनगर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च (हिं.स.) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते १४ एप्रिल दरम्यान होणा-या या कार्यक्रमास विद्यार्थी विकास मंडळ सल्लागार समितीने घेतलेल्या विविध निर्णयांना व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिल्याची माहिती संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विषय पत्रिकेतील सहाव्या विषयास परिषदेने सर्वानुमते मान्यता दिली. बैठकीत प्रकुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. या बैठकीचा कार्य वृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला. त्यात करण्यात आलेल्या शिफारशी पुढीलप्रमाणे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये जयंती दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी व १४ एप्रिल रोजी केवळ अभिवादन करुन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर व्याख्यानाचे आयोजन १८ फेब्रुवारी व १३ एप्रिल रोजी सकाळी करण्यात यावे, या कार्यक्रमात विविध स्थळांचे पारितोषिक वितरण करण्यात यावे आणि जयंती पूर्णवेळ अनुक्रमे पोवाडा व भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच १४ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता विद्यापीठ गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढावी आणि सर्व विद्यार्थ्यांना मोतीचूर लाडूंसोबत नाश्ता द्यावा, असे ठरवण्यात आले.

१३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी गायक अजय देहाडे आणि चेतन चोपडे यांच्या उपस्थितीत 'भीमगीत रजनी' कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

• १४ एप्रिल, २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक साप्ताहिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवण्यात आले असून, त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

७ एप्रिल रोजी ज्ञानस्रोत केंद्रामार्फत वाचन सप्ताह आणि पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

८ एप्रिल रोजी, विद्यार्थी विकास मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन आणि कथाकथन स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात. त्याच दिवशी संध्याकाळी विद्यापीठाच्या नाट्यगृहात ज्येष्ठ कथाकार आप्पासाहेब खोट यांचा कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

९ एप्रिल २०२६ रोजी, विद्यापीठ आरोग्य केंद्राने कमलनयन बजाज आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने वैद्यकीय तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल.

१० रोजी महात्मा फुले फाउंडेशनच्या माध्यमातून भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

११ रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्तव्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे.

१२ रोजी, ज्ञानस्रोत केंद्राच्या माध्यमातून ग्रंथालयात १८ तासांचा वाचन उपक्रम आयोजित करण्यात यावा आणि संध्याकाळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ नाट्यगृहात 'भीमगीत जलसा' आयोजित करण्यात यावा.

आठवड्याभरात क्रीडा विभागामार्फत बुद्धिबळ, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटनसारख्या स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.

जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या युवा महोत्सवामध्ये लोककला महोत्सवातील कलाप्रकारांचे सादरीकरण जिल्हास्तरीय प्राथमिक फेरी म्हणून घेण्यात यावे. या लोककला महोत्सवात प्रत्येक कला प्रकारातून गुणानुक्रमे ५ पारितोषिक देण्यात यावे. या विजेत्यांचा लोककला महोत्सव केंद्रीय पध्दतीने विद्यापीठात जानेवारी २०२७ मध्ये नामविस्तार दिनापूर्वी घेण्यात यावा. तसेच जिल्हा युवा महात्सवातील २८ कलाप्रकारातील विजेत्यांचा केंद्रीय युवा महोत्सव गतवर्षी प्रमाणे घेण्यात यावा. आगामी शैक्षणिक वर्षात ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान केंद्रीय युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. तर नामविस्तार दिनापुर्वी १२ व १३ जानेवारी रोजी दुसरा लोककला महोत्सव घेण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande