बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, बाबर आझमला वगळले
इस्लामाबाद, 04 मार्च (हिं.स.)पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बांगलादेशमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पण बाबर आझमला संघात स्थान देण्यात आलेले नाही. या महिन्यात ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय
बाबर आझम


इस्लामाबाद, 04 मार्च (हिं.स.)पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बांगलादेशमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पण बाबर आझमला संघात स्थान देण्यात आलेले नाही. या महिन्यात ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या मालिकेतून बाबरला वगळल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात.

२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती, ज्यामध्ये संघ सुपर ८ टप्प्यात बाहेर पडला. संपूर्ण स्पर्धेत बाबर आपल्या फंलदाजीने कमाल करु शकला नाही. आणि त्याला शेवटच्या सुपर ८ च्या सामन्यातून प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. एकदिवसीय संघातून त्याला वगळणे हे निवडकर्त्यांनी मोठा बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. बाबरसोबतच, सैम अयुबलाही संघातून वगळण्यात आले आहे. एकदिवसीय क्रिेकेटमध्ये बाबर आझम पाकिस्तानच्या संघाचा प्रमुख आधारस्तंभ मानला जातो. श्रीलंकेविरुद्ध अलिकडेच त्याने शतक झळकावले असूनही, त्याला संघातून वगळणे हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे.

पीसीबीने सहा नव्या क्रिकेटपटूंना संघात स्थान दिले आहे. यामध्ये साहिबजादा फरहान, अब्दुल समद, माझ सदाकत, मोहम्मद गाझी घोरी, साद मसूद आणि शामिल हुसेन यांचा समावेश आहे. हे सर्वजण अबू धाबी येथे इंग्लंड लायन्स विरुद्ध पाकिस्तान शाहीनकडून खेळले होते. मोहम्मद गाझी घोरीचा यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीकडे पुन्हा एकदा संघाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. हरिस रौफ आणि हुसेन तलत संघात परतले आहेत, तर अबरार अहमद, फहीम अश्रफ, फैसल अक्रम, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि सलमान अली आघा सारख्या क्रिकेटपटूंना कायम ठेवण्यात आले आहे.

एकेकाळी बाबर आझमचे नाव तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाच्या यादीत वरच्या स्थानावर होते. पण बदलत्या क्रिकेटच्या परिस्थिती आणि आक्रमक फलंदाजीच्या मागणीमुळे, बाबरचा मंद स्ट्राईक रेट आणि मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्यास असमर्थता त्याच्यावर परिणाम करत असल्याचे दिसून येते. एकदिवसीय सामन्यांमध्ये ४६ पेक्षा जास्त सरासरी असलेल्या फलंदाजाला वगळल्याने निवडकर्ते आता आकडेवारीच्या पलीकडे पाहत आहेत असे दिसून येते. जर बाबरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये किंवा आगामी मालिकेत दमदार पुनरागमन केले नाही, तर त्याची आंतरराष्ट्रीय धोक्यात येऊ शकते.

बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ

शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अश्रफ, फैसल अक्रम, हरिस रौफ, हुसेन तलत, मुआज सदाकत, मोहम्मद रिजवान (यष्टिरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद गाजी घोरी (यष्टिरक्षक), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा आणि शामिल हुसेन.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande