टी-20 विश्वचषक : टीम इंडियाला उपांत्य फेरीत इंग्लंडचे आव्हान
मुंबई, 04 मार्च, (हिं.स.) टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना दोन वेळा विजेत्या इंग्लंडशी होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची ह
भारतीय क्रिकेट संघ


मुंबई, 04 मार्च, (हिं.स.) टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना दोन वेळा विजेत्या इंग्लंडशी होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. गेल्या दोन विश्वचषकांमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्या संघाने अंतिम फेरी जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारत २० षटकांत ६ विकेट्स गमावून फक्त १६८ धावा करू शकला. सलामीवीरांना चांगली सुरुवात करता आली नाही. पण विराट कोहली (५०) ने अर्धशतक झळकावून डाव सावरला. त्यानंतर हार्दिक पंड्याने ३३ चेंडूत ६३ धावा करत सामना पार बदलून टाकला. इंग्लंडकडून क्रिस जॉर्डन सर्वोत्तम गोलंदाज ठरला आणि त्याने तीन विकेट्स घेतल्या.

त्यानंतर जे घडले ते भारतासाठी दुःस्वप्न ठरले. इंग्लंडचे सलामीवीर ऍलेक्स हेल्स (८६) आणि जोस बटलर (८०) यांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. त्यांनी एकही विकेट न गमावता लक्ष्याचा पाठलाग केला आणि चार षटके शिल्लक असताना सामना जिंकला. हा भारताचा टी२० क्रिकेटमधील सर्वात वेदनादायक पराभवांपैकी एक होता. २०२२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला होता.

दोन वर्षांनंतर, भारताला आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत धावसंख्या निश्चित करण्याची संधी मिळाली. यावेळी, गयानाच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत १७१ धावा केल्या. रोहित शर्माने शानदार ५७ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ४७ धावा जोडल्या, तर हार्दिक पंड्याने १३ चेंडूत २३ धावांची स्फोटक खेळी केली होती.

टीम इंडियाने ठेवेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला संघर्ष करावा लागला होता. भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला आणि इंग्लिश फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत फक्त १०३ धावांवर सर्वबाद झाला. अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन, तर जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेतल्या होत्या. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आपला दुसरा टी२० विश्वचषक जिंकला होता.

भारत आणि इंग्लंडमधील हेड-टू-हेड टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बाबतीत, दोन्ही संघ आतापर्यंत २९ वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. भारतीय संघाने १७ सामने जिंकले आहेत, तर इंग्लिश संघाने फक्त १२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि कंपनी आणखी एक विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande