
रायगड, 05 मार्च (हिं.स.) । पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाणे हद्दीत प्रसाद देण्याच्या बहाण्याने सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, ही घटना ४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे 11.25 वाजता मौजे गडब गावाजवळ, जांभेला गावाच्या वेशीजवळील रस्त्याच्या कडेला घडली.
माहितीनुसार फिर्यादी त्या ठिकाणी लाकडी बाकड्यावर बसलेले असताना, दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. त्यांनी फिर्यादींना बिस्कीटच्या पुड्यांची पिशवी देऊन “यामध्ये प्रसाद आहे, तुमच्या गावात वाटा” असे सांगितले.
अनन्यांनी पिशवीत चार हजार रुपये ठेवण्यास सांगितले आणि फिर्यादींच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या पिशवीत ठेवायला लावल्या. या वेळी आरोपींनी फिर्यादींना बोलण्यात गुंतवून ठेवून, अंगठ्या घेऊन तात्काळ पसार झाले. याशिवाय, कोलेटीवाडी येथील एका साक्षीदाराचीही अशाच प्रकारची फसवणूक करून सोन्याची अंगठी घेतल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. घटनास्थळी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिक्षा गायकवाड करत आहेत.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके