
जळगाव, 05 मार्च (हिं.स.) महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणाचं जळगाव कनेक्शन उघडकीस आलं आहे. या प्रकरणातील सातव्या आरोपीला अटक करण्यात आलीय. जळगावच्या चोपडा तालुक्यातून सतीश चौधरी या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. सतीश हा इलेक्ट्रिशियन असून तो चोपडा तालुक्यातील च-हाडीतल्या गौतमनगर इथला रहिवासी आहे. त्याला आज अंबरनाथच्या चिखलोली न्यायालयात हजर केलं जाणार आहे. स्त्रीबीज तस्करी प्रकरणात याआधी सहा जणांना अटक करण्यात आली होती.त्यात सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे, सोनल गरेवाल, सुमित सोनकांबळे यांच्या अटकेनंतर कालच बदलापूर पोलिसांनी नाशिक मधून डॉक्टर अमोल पाटीलला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी बोगस आधार कार्ड बनवणारा संशयित आरोपी सतीश चौधरी याला अटक करण्यात आलीय.सतीश चौधरीला अटक करून पोलिसांनी बोगस आधारकार्डच्या निर्मितीशी संबंधित कारवाई पुढे नेली आहे.
या अटकेनंतर प्रकरणातील आरोपींचा तपास अजून गती पकडेल अशी शक्यता आहे.बदलापूरात स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकारचं हे भीषण रॅकेट चक्क एका घरातून चालवलं जात होतं. सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती, असा आरोप आहे. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. तिथल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणलं. या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर