
लातूर, 05 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून एका महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी रेणापूर नाका येथील नवीन बसस्थानक परिसरात दोन संशयित महिलांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि सापळा रचून एका महिलेला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव पुनम जितू कांबळे (वय ३४, रा. गांधीनगर, उदगीर) असून, तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम वजनाचा, ७८,९५१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात तिने कबुली दिली की, तिने आपल्या साथीदार अनिता विशाल कांबळे यासह मागील चार-पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद आणि अहमदपूर बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी केली आहे.
आरोपीस अटक करून औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून, अनिता कांबळे फरार असून तिचा शोध सुरू आहे. पोलीस प्रवाशांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis